कर्जत ( प्रतिनिधी) :- कोंभळी येथील प्राथमिक शाळेत राजकीय स्वार्थासाठी राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप करत येथील तब्बल 18 पालकांनी शाळेकडे दाखल्याची मागणी केली आहे. पालकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याने पालकांनी आपल्या पाल्याच्या दाखल्याची मागणी केली आहे.
दरम्यान शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप संतोष शेलार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. शेलार यांनी तक्रारीत नमूद केले आहे की,कोंभळी जि. प. शाळा येथील शालेय व्यवस्थापन समितीची निवड करताना मार्गदर्शक सूचनांनुसार पालकांना बोलावून उपस्थिती नोंदवून सह्या घेण्यात आल्या होत्या.परंतु, त्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे उपस्थित पालक घरी निघून गेले.
त्यामुळे मोजक्याच राहिलेल्या पालकांमधून शाळेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली, अशी त्यांची तक्रार आहे.
सदर निवड रद्द करून पुन्हा सर्व पालकांमधून राजकीय हस्तक्षेप विरहित निवड करण्यात यावी अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
स्थानिक शिक्षण प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या या तक्रारीमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, गटशिक्षणाधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, कोंभळी गाव हे पुरोगामी असताना राजकीय स्वार्थासाठी इतक्या स्तराला जाणे हे शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या कोंभळी गावाला भूषणावह नाही, यामधून शिक्षकांनाही वेठीस धरतात, गावकऱ्यांनाही वेठीला धरतात, यामुळे गावकऱ्यांना गावकऱ्यांना देखील मनस्ताप होत असून मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत आहे. राजकीय हस्तक्षेपातून समितीची निवड होत असल्याने आमचा त्या भूमिकेला विरोध आहे , शाळा व्यवस्थापन समितीला नाही व शालेलाही नाही.


