​कर्जत (प्रतिनिधी): ​कर्जत तालुक्यातील कौडाणे गावातील कोंभळी रस्ता ते सुद्रिक वस्ती (पश्चिम भाग) या अत्यंत महत्त्वाच्या १ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे खडीकरण  काम ऑगस्ट २०२४ मध्ये प्रशासकीय स्तरावर मंजूर होऊनही, केवळ ग्रामपंचायत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे हे काम अद्याप सुरू झालेले नाही. रस्त्याचे काम वर्षभरापासून केवळ कागदावरच असल्याने येथील रहिवासी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अक्षरशः 'चिखल' झाला आहे.
​कोंभळी रस्ता ते सुद्रिक वस्ती दरम्यान असलेल्या या रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले होते. पाऊस झाल्यावर रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरते, पायी चालणेही कठीण होते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना या रस्त्यावरून जाताना पावसाळ्यात कसरत करावी लागते.
​स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या १ किलोमीटर रस्त्याच्या खडीकरणाचे काम अंदाजे ऑगस्ट २०२४ मध्ये मंजूर झाले होते. कामासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. परंतु, ग्रामपंचायत प्रशासनाने हे काम सुरू करण्यासाठी कोणतीही पाऊले उचलली नाहीत.
​स्थानिक रहिवाशी आणि सुद्रिक वस्तीतील नागरिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "रस्त्यासाठी निधी मंजूर होऊनही अधिकारी आणि पदाधिकारी जाणीवपूर्वक हे काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. निवडणुकीच्या वेळी मतांसाठी येणारे लोक आता तोंड दाखवत नाहीत. पावसाळ्यात चिखलामुळे आम्हाला गावात, बाहेरगावी जाण्यासाठी किंवा मुलांना शाळेत सोडण्यासाठी रोज मोठा संघर्ष करावा लागतो" असे त्यांनी सांगितले.
​कौडाणे ग्रामपंचायत आणि अधिकारी यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे आणि तातडीने मंजूर झालेले रस्त्याचे खडीकरण काम सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जर ग्रामपंचायतीने यावर त्वरित कार्यवाही केली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे.
​प्रशासनाने दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सदर रस्त्याचे काम लवकरच सुरू करणार आहोत, ऑनलाईन मस्टर बंद असल्याने या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नव्हते. मस्टर सुरू झाल्यानंतर काम सुरू करणार आहोत.
- प्रमोद सुद्रीक, सरपंच , कौडाने