पाणी पुरी

★ साहित्य

●    पुरीचे साहित्य

१     रवा …….. १ कप
२     मैदा ……..३ टेबल स्पून
३     बेकिंग पावडर( सोडा)……….. १/४ चहाचा चमचा
४     मीठ ………………………………१/२ चहाचा चमचा
५     तळण्याकरता तेल

●    पाण्याचे साहित्य

१     चिंचेचा कोळ ……….१/२ कप
२     पाणी …………………२ कप
३     भाजलेली जिरे पूड ………२ टेबल स्पून
४     न भाजलेले जिरे …………२ टेबल स्पून
५     कोथिंबीर चिरलेली ………..१/२ कप
६     हिरव्या मिरच्या …………….३
७     पुदिन्याची पाने …………….१ कप
८     काळे मीठ ……………………१ टेबलस्पून
९     बुंदी ……………………………१ टेबल स्पून
१०    चिरलेला गुळ …………………….२ टेबल स्पून

 

●    सारणाचे साहित्य  

१     उकडलेले बटाटे ………………………….. २ मध्यम
२     पांढरे वाटाणे………………………………. १/२ कप उकडून
३     हिरवी चटणी
४     चिंचेची चटणी

■ कृती

पुरी बनवणे
परातीत रवा ,मैदा, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करावे व थोडे थोडे कोमट पाणी मिसळत घट्ट पीठ भिजवावे. नेहमीच्या पुर्यांप्रमाणेच पीठ घट्ट असावे. ओलसर कापडाने झाकून ३० मिनिटे ठेवावे .

या पीठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवावे. पीठ सुकू न देण्याची खबरदारी घ्यावी.

या गोळ्यांचे सुक्या मैद्याच्या सहाय्याने मोठी व पातळ पोळी/चपाती लाटावी. या चापातीतून छोट्या बिस्किट साच्याने वा छोट्या झाकणाच्या मदतीने छोट्या छोट्या पुऱ्या काताराव्या.

पुऱ्या तळणे
पुऱ्या तळताना तेल कडकडीत तापलेले असावे अन्यथा पुऱ्या तेल पितील ,फुगणारही नाहीत व मऊ होतील. तेल पुरेसे तापले आहे किंवा नाही ते बघण्यासाठी एक पुरी तेलात टाका. ती लगेच वर आली तर तेल पुरेसे तापले आहे असे समजावे. पुरी तळाशीच राहिली तर तेल अजून तापू द्यावे.

पण तेल इतकेही तापू देऊ नये कि त्यातून धूर येऊ लागेल. असे झाल्यास पुऱ्या करपट होतील.

पुऱ्या तळण्यासाठी तेल खोलगट भांड्यात किंवा कढईत घ्यावे व पुऱ्या झार्याच्या मदतीनेच तळावे.

तळताना पुरी मधोमध झार्याच्या मदतीने थोडी दाबावी म्हणजे ती चांगली फुलेल… सर्व पुऱ्या अशा छान फुगायला हव्यात …एकदा फुगलेली पुरी पालटावी व चांगली शिजू द्यावी.

पुऱ्या करपू न देता तेलातून बाहेर काढून किचन टॉवेल वर पसराव्या व तेल निथळले व थंड झाल्या कि हवाबंद डब्यात भरून ठेवाव्या.

मसाला पाणी
कोथिंबीर, पुदिना व हिरव्या मिरच्या यांची हँड ब्लेंडर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी.

पाण्यासाठीचे बाकी सर्व साहित्य व वरील पेस्ट पाण्यात मिसळावी. गुळ चांगला विरघळून घ्यावा. मसाल्याचा झणझणीतपणा व चिंचेचा आंबट पणा चवीप्रमाणे कमीजास्त करून घ्यावा.

हे तयार पाणी गाळून घेऊन फ्रीज मध्ये २ते ३ तास थंड करून घ्यावे मगच त्याचा उपयोग करावा. पाणीपुरी करायला घेण्यापूर्वी या पाण्यात बुंदी मिसळावी.

सारण करण्यासाठी
एका बाऊल मध्ये पांढरे वाटाणे, आणि कुस्करलेले बटाटे आणि मीठ घालून चांगले मिसळावे व बाजूला ठेवावे.वाढताना एक पुरी घ्यावी व तिच्या कडक बाजूला बोटाने टोचून एक भोक करावे त्यात थोडे सारण भरावे त्या सोबत हिरवी चटणी व चिंचेची चटणी ही थोडी थोडी भरावी आता फ्रीजमध्ये थंड केलेल मसाला पाणी घालावे. हे पाणी आधी चांगले ढवळून घ्यावे .

अशा तर्हेने घरी केलेल्या पाणी पुरीचा आस्वाद घ्या. पाणीपुरीला उत्तरेकडे गोलगप्पे म्हणतात तर बंगाल मध्ये पुचके म्हणतात!